सिरोंचा-आलापल्ली आणि कुरखेडा-कोरची मार्गावरील वाहतूकीस मनाई.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

सिरोंचा-आलापल्ली आणि कुरखेडा-कोरची मार्गावरील वाहतूकीस मनाई.!

दि. 31 मे 2025
MEDIA VNI 
सिरोंचा-आलापल्ली आणि कुरखेडा-कोरची मार्गावरील वाहतूकीस मनाई.! 
- पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या सूचना.! 
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अपघातांची शक्यता आणि राष्ट्रीय महामार्गांवरील अपूर्ण कामामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याची दखल घेत गडचिरोलीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी दोन प्रमुख मार्गांवरील वाहतुकीसंदर्भात महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र. 353-C वरील सिरोंचा ते आलापल्ली मार्गावर मोठ्या प्रमाणावर जड वाहने सुरु असून सदरील रस्ता पावसाळ्यात जड वाहतुकीस पूर्णतः अयोग्य असल्याने हा मार्ग 5 जून च्या मध्यरात्रीपासून ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत सिरोंचा ते आलापल्ली मार्गावरील जड वाहने मंचेरियाल–राजुरा–बल्लारशाह–चंद्रपूर–गडचिरोली या पर्यायी मार्गाचा तसेच आलापल्लीहून मंचेरियालकडे जाण्यासाठी आष्टी–बल्लारपूर–मंचेरियाल या पर्यायी मार्गाचा वापर करतील. मात्र, आपत्कालीन, आरोग्य, पाणीपुरवठा, पोलीस, अन्न-औषध, महावितरण, दूरसंचार, रस्ते दुरुस्ती व प्रवासी सेवा वाहनांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्र. 543 वरील कुरखेडा ते कोरची मार्गावर सती नदीवरील पूरबुडीत जुन्या पुलाजवळ नव्या मोठ्या पुलाचे बांधकाम सुरु असून वळण रस्त्याचा वापर वाहतुकीसाठी करण्यात येत आहे. मात्र पावसाळ्यात हा वळण मार्ग पाण्याखाली जाऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दिनांक 4 जून 2025 मध्यरात्री पासून ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत कुरखेडा–कोरची मार्गावरील वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत. हलक्या वाहनांसाठी कुरखेडा-आंधळी फाटा-वाघेडा-मालदुगी-गोठणगाव फाटा आणि कुरखेडा-तळेगाव-खेडेगाव-अंतरगाव-पुराडा हे मार्ग वापरण्यात येतील, तर जड वाहनांसाठी कुरखेडा–वडसा–आरमोरी–वैरागड–गोठणगाव फाटा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित तहसिलदार, पोलीस विभाग, परिवहन विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना आवश्यक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. मार्गदर्शक फलक इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेत लावण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची असून ट्रॅफिक नियमनासाठी पोलीस विभाग आवश्यक मनुष्यबळ व बॅरेकेडींगची व्यवस्था करणार आहे. संबंधित तहसिलदार व पोलीस निरीक्षकांनी आठवड्याला संयुक्त अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावेत. मोटार वाहन कायदा 1988, भारतीय दंडसंहिता 1860, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत संबंधितांचे पालन करणे बंधनकारक असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासनाने वाहतूकदार, वाहनचालक तसेच नागरिकांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
Traffic prohibited on Sironcha-Alapalli and Kurkheda-Korchi routes!
#गडचिरोली #Gadchiroli #Maharashtra #MediaVNI

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->