दि. 02 जून 2025
अवैध सावकारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : आझाद समाज पक्षाची मागणी.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : जिल्ह्यात विविध बचत गट, परवानाधारक सावकार, मोठे दुकानदार व खाजगी व्यक्ती यांचेकडून सावकारीचा व्यवसाय मोठ्या जोमात करण्यात येत आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याने सदर बचत गट, परवानाधारक सावकार, मोठे दुकानदार, व्यापारी व खाजगी व्यक्ती यांचे कडून गरजूंकडून नियमबाह्यपणे आणि अत्यंत मनमानी पद्धतीने व्याज आकारण्याचा गोरख धंदा सुरू आहे. यामुळे संबंधितांची खुली लूट असून अशा व्यक्ती, बचत गट व संस्थांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केली आहे.
आझाद समाज पक्षाच्या वतीने जिल्हा उपनिबंधक यांना दिलेल्या निवेदनात राज बन्सोड यांनी म्हटले आहे की, सदरचे बचत गट, व्यापारी, व्यक्ती हे सामान्य माणसाच्या अडचणी हेरून त्यांना नियमबाह्यपणे कर्ज पुरवठा करतात व २ ते १० टक्के मासिक व्याजदर आकारून वसुली करतात. सदर उसने कर्ज रक्कम देण्याकरिता कर्जदाराकडून त्यांच्या घर, शेती, प्लॉट, सोने किंवा इतर संपत्तीचे बेकायदेशीर पद्धतीने विक्रीकरार अथवा गहाणखत नोटरी करून घेतात. व त्यानंतर व्याज वसुली करिता तगादा लावतात. आणि व्याज वसूल करण्यासाठी कर्जदार व्यक्तींचे घरी जाऊन किंवा वारंवार फोन करून मानसिक दबाव निर्माण करतात. एवढेच नव्हे तर ज्यांचे नोटरी खरेदीखत, करारनामे करून घेतले आहेत अशा जागांचा कब्जा घेण्याचा प्रयत्नही करतात. नियमाप्रमाणे वार्षिक १८ टक्केच्यावर कोणालाही अधिकची व्याज आकारता येत नसतांना सदरचा गंभीर प्रकार सुरू असून अशा अवैध सावकारांवर व व्यक्तींवर सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने तातडीने मोहीम उघडून सदर सावकारीवर नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे राज बन्सोड यांनी म्हटले आहे.
गडचिरोली शहर व जिल्ह्यात अशा पद्धतीची अवैध सावकारी करणारे व शासनाच्या नियमापेक्षाही मासिक २ ते १० टक्के म्हणजेच वार्षिक २४ ते १२० टक्के अशी व्याज वसुली करणाऱ्या बचत गट, व्यक्ती अशांवर कारवाई करून त्यांचे विरोधात गुन्हे नोंदविण्याची मोहीम सुरू करावी. तसेच अशा पद्धतीने ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्याकडून आपल्या विभागाने तक्रारी मागवून जिल्ह्यातील अवैध सावकारी विरोधात मोहीम उघडण्यात यावी, अशी मागणीही आझाद समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
Take strict action against illegal moneylenders: Demand of Azad Samaj Party!
#गडचिरोली #Gadchiroli #Maharashtra #MediaVNI