दि. 15 सप्टेंबर 2025
‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ महिलांसाठी आरोग्य शिबीर.! - १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विशेष अभियान.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : महिलांचे आरोग्य हे संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आरोग्याशी थेट जोडलेले आहे. याच उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आयुष्मान आरोग्य मंदिरे , प्राथमिक आरोग्य केंद्रे , ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालये येथे या अभियानांतर्गत आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
या शिबिरांमध्ये महिलांसाठी प्रतिबंधात्मक, आरोग्यवर्धक आणि उपचारात्मक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील. उच्च रक्तदाब, मधुमेह, स्तन व गर्भाशय मुखाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य रोगांची तपासणी केली जाणार आहे. तसेच रक्तक्षय (ॲनिमिया) तपासणी, क्षयरोग व सिकल सेल तपासणी, गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व काळजी (ANC), माता व बाल संरक्षण कार्ड वितरण, तसेच लसीकरण सेवा पुरविण्यात येतील असेल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी सांगितले आहे.
महिलांसाठी पोषण, मासिक पाळीची स्वच्छता व निरोगी जीवनशैली याविषयी मार्गदर्शन सत्रांचे आयोजन होणार असून, रक्तदान शिबिरे व मानसिक आरोग्याबाबत समुपदेशनही करण्यात येईल. याशिवाय आयुष्मान भारत, ABHA कार्ड व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PM-JAY) यांसाठी नोंदणी व मदत डेस्कही उपलब्ध राहील.
जागरूकता वाढविण्यासाठी शिबिरांच्या आयोजनात लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे. समुदायातील प्रत्येक महिलेला शिबिराची माहिती मिळावी यासाठी घराघरात जाऊन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ माधुरी किलनाके यांनी सांगितले.
दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली श्री सुहास गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या जिल्हा कृती दलाच्या बैठकीत या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. महिलांनी मोठ्या संख्येने शिबिरात हजेरी लावून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले त्यांनी केले. यावेळी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ प्रफुल्ल हुलके जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. नोडलं अधिकारी डॉ. स्मिता साळवे,डॉ प्रेरणा देवतळे यांनी जिल्ह्यातील शिबिराचे नियोजन केले आहे.
स्वस्थ नारी, सशक्त परिवार’
अभियान केवळ आरोग्य तपासणीपुरते मर्यादित नसून महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी सजग करण्याचे व त्यांना सशक्त बनविण्याचे महत्त्वाचे साधन ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले आहे तसेच स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत सर्व महिलांनी आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
Swastha Nari, Sashak Parivar' health camp for women.!
- Special campaign from 17 September to 2 October 2025.!
#Gadchiroli #MediaVNI #Maharashtra