दि. 20 डिसेंबर 2025
वाघोली डेपोतील अवैध वाळू विक्री प्रकरण ‘दडपण्याचा’ प्रयत्न.?- चौकशी अहवाल लपविल्याचा गंभीर आरोप, प्रशासनाच्या भूमिकेवर संशय.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील डेपो क्रमांक ६, मौजा वाघोली येथील अवैध वाळू विक्री व कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शासनाच्या स्पष्ट निर्देशानुसार करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल अद्याप तक्रारदारास देण्यात न आल्याने हा अहवाल जाणीवपूर्वक दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
या प्रकरणी गंगाधर धर्मा शेडमाके यांनी १६ फेब्रुवारी २०२४ रोजी शासन निर्णयाचा आधार घेत संबंधित विभाग, जिल्हाधिकारी गडचिरोली तसेच इतर सक्षम यंत्रणांकडे अवैध वाळू विक्रीबाबत तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, चौकशी पूर्ण होऊनही आजतागायत अहवालाची सत्यप्रत तक्रारदारास न देण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चौकशी अहवाल मिळत नसल्यामुळे तक्रारदारास चामोर्शी येथील न्यायालयात दावा दाखल करण्यात अडथळे येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दोषींना पाठीशी घालण्याचा हा प्रकार तर नाही ना, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, शेडमाके यांनी २१ मार्च २०२५ रोजी नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाकडे अनियमिततेबाबत लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे तसेच तक्रारदारास त्याबाबत माहिती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. तरीही प्रत्यक्षात कोणताही अहवाल देण्यात आलेला नसल्याचा आरोप आहे.
वारंवार लेखी पाठपुरावा करून, तसेच न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा आणि माध्यमांतून प्रकरण जनतेसमोर आणण्याचा इशारा देऊनही प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. “जर प्रशासनाने योग्य निर्णय घेतला नाही, तर आम्हाला आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा गंभीर इशारा गंगाधर शेडमाके यांनी दिला आहे.
वाघोली डेपोतील कथित गैरप्रकारांची निष्पक्ष व सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होणार का, की हे प्रकरण फाईलीतच दडपले जाणार, याकडे आता संपूर्ण चामोर्शी तालुक्याचे लक्ष लागले आहे.
