दि. 06 जुलै 2026
मुसळधार पावसाचा कहर! भामरागडच्या गुंडेनूर नाल्याला महापूर; सात गावांचा संपर्क तुटला, जीव धोक्यात घालून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा संताप!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भामरागड तालुक्यात पुन्हा एकदा भीषण परिस्थिती निर्माण केली आहे. लाहेरी–बिनागुंडा मार्गावरील गुंडेनूर नाल्याला आलेल्या महापुरामुळे सात गावांचा बाह्य जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला असून, हजारो नागरिकांना दैनंदिन जीवनासाठी मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, गुंडेनूर नाल्यावर पुलाचे बांधकाम अनेक महिन्यांपासून सुरू असले तरी ते अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे पूर आल्यानंतर नागरिकांना पर्याय नसल्याने जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून पायी प्रवास करावा लागत आहे. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मोठा धोका पत्करून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.
पूरामुळे बिनागुंडा परिसरातील सात गावांचा संपर्क पूर्णपणे खंडित झाला असून शालेय शिक्षण, आरोग्य सेवा, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तसेच आपत्कालीन सेवांवर गंभीर परिणाम झाला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना नदी-नाले ओलांडू नयेत, असे आवाहन केले असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांनी अपूर्ण पुलाच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित यंत्रणेला जबाबदार धरले आहे. "दरवर्षी पूर येतो, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होत नाहीत. प्रत्येक पावसाळ्यात आमच्या जीवाशी खेळ सुरू असतो," अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
भामरागडसारख्या अतिदुर्गम भागातील नागरिकांना सुरक्षित वाहतूक हा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे गुंडेनूर नाल्यावरील अपूर्ण पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करून सात गावांचा वर्षभर अखंड संपर्क कायम ठेवण्यासाठी शासनाने युद्धपातळीवर पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
Gundenur #MediaVNI #Rain #Gadchiroli #Bhamragad