दि. 13.09.2023
महेश ठावरे यांचे एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत आलं इंडिया रँकमध्ये सहावे स्थान
- गडचिरोलीच्या तरुणाचे नेमबाजीत प्रावीण्य एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत सहावे स्थान
- राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी आर्थिक मदतीची गरज
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : निसर्गाच्या सानिध्यात सर्व क्षेत्रात प्रगती करत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील तरुणाने नेमबाजी या क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव उंचाविले आहे.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी महेश ठावरे यांची आर्थिक परिस्थिती मजबूत नाही. स्थानिक प्रशासन, सरकार शासनकर्तेडून आर्थिक मदतीची गरज आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमात गडचिरोली येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते महेशचे सत्कार करण्यात आले होते. पण अजूनही आर्थिक मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे. क्रीडा क्षेत्रातून जिल्ह्यासह देशाचा नाव उंचावण्यासाठी कोणीतरी पुढे येऊन सहकार्य करावे अशी आशा व्यक्त केली आहे.
1 ते 10 सप्टेंबर दरम्यान आयोजित 32 ऑल इंडिया मावळंकर नेमबाजी स्पर्धा इंदौर शुटिंग चॅम्पियनशिपमध्ये महेश प्रभाकर ठावरे यांनी दहा मीटर एअर रायफल नेमबाजी पुरुष गटात सहावे स्थान पटकाविले आहे. सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील महेश ठावरे यांनी नेमबाजी क्रीडा प्रकारात मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यांनी मिळविलेल्या यशाचे नेमबाजीसारख्या जिल्ह्याला नवीन असलेल्या क्रीडा प्रकाराला उत्तेजन मिळेल. गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात महेश ठावरे याचं कौतुक केले जात आहे. आपल्या यशाचे श्रेय आईवडील, भाऊ व गुरुजनांना दिले.
होतकरू खेळाडूंना प्रशिक्षण देणार : महेश ठावरे
महेश ठावरे यांनी जिल्ह्यातील खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची इच्छा दर्शवली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तरुण विविध शासकीय नोकरीकरिता तयारी करतात. प्रत्येक विभागात खेळाडूंकरिता राखीव पद असते. अशावेळी एखाद्या खेळात प्रावीण्य प्राप्त करून शासकीय नोकरी मिळविता येते. असे मत महेश ठावरे यांनी व्यक्त केले. नेमवाजी या क्रीडा प्रकाराच्या प्रशिक्षणाची सोय गडचिरोली जिल्ह्यात नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे त्यांनी होतकरू खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली आहे. ही आतिशय कौतुकास्पद बाब आहे.