गडचिरोली जिल्ह्यातील विदारक चित्र; जखमी बापासाठी खाटेची कावड करून 18 किलोमीटरचा प्रवास.! नेमकं काय घडलं? बघा..
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : मुसळधार पावसानं महाराष्ट्राला गेल्याकाही दिवसांपासून चांगलंच झोडपून काढलं आहे. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील अतिदृर्गम अशा भागात एक व्यक्ती (दि. 26 जुलै) ला जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यासाठी त्याच्या मुलाला मोठी कसरत करावी लागली.आधुनिक काळातला श्रावण बाळ होत खाटेची कावड करुन त्यानं वडिलांना रुग्णालयापर्यंत पोहोचवलं आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
मालू केये मज्जी (वय 67, रा. भटपार ता. भामरागड) असे जखमी पित्याचे नाव आहे. जिल्ह्यात आठ दिवसांपासून अतिवृष्टी सुरु आहे. त्याचा सर्वाधिक फटका भामरागड या नक्षलग्रस्त (Gadchiroli Naxal)आणि अतिदुर्गम गावाला बसलाय. पर्लकोटा नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने अद्यापही भामरागड शहराचा संपर्क तुटलेलाच आहे. तालुक्यातील घनदाट जंगलातील दुर्गम, अतिदुर्गम गावातील स्थितीही याहून वेगळी नाही.
अतिवृष्टीचा आणि पुराचा फटका भामरागड तालुक्याला बसला असून अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. मालू मज्जी हे शेतात घसरून पडल्यानं त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाली होती. त्यामुळं प्रचंड वेदनेनं विव्हळत होते. वडिलांचं हे दुःख सहन न झाल्यानं मुलानं त्यांना कसंही करुन रुग्णालयात उपचारांसाठी नेण्याचा निर्णय घेतला. त्यांचा मुलगा पुसू मालू मज्जी याने मित्रांच्या मदतीने खाटेची कावड केली आणि मालू यांना त्यावर झोपवून भामरागडला निघाला.
मात्र, कुठलंही वाहन नसल्यानं खाटेची कावड तयार करून वडिलांना त्यावर झोपवून 18 किलोमीटरचा चिखल तुडवत त्यानं प्रवास केला. वाटेत त्याला तुडुंब भरलेली नदी पार करायची होती. त्यासाठी लहानशा होडीतून पलीकडे जाऊन त्यानं वडिलांना रुग्णालयात दाखल केलं. उपचारानंतर त्याच कावडीवरुन वडिलांना घेऊन तो भटपार इथं आपल्या गावी परतला.
दरम्यान, भामरागड तालुका हा नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम जंगलांचा भाग म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पाऊसही मोठ्या प्रमाणावर पडतो, पावसाळ्यात इथल्या नद्यांना हमखास पूर येतो. यंदाही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानं इथं वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या लोकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला आहे. नद्यांना पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटल्याच्या घटना यंदाच्या पावसाळ्यात पहायला मिळाल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात नागरिकांचे प्रचंड हाल.!
या प्रसंगानंतर पुत्रप्रेमाची तर चर्चा झालीच, पण अतिदुर्गम भागात पुरामुळे रुग्णांचे कसे हाल होत आहेत, हे देखील यामुळे चव्हाट्यावर आले. काही दिवसांपूर्वी गरोदर मातेला जीसीबीच्या बकेट मध्ये बसून नाला पार करावा लागला होता. तर काही महिन्यांपूर्वी वेळेवर रुग्णवाहीका उपलब्ध न झाल्याने एका चार वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नसून दुर्गम भागातील आदिवासींचे प्रचंड हाल होताना दिसून येत आहे
A shocking picture of Gadchiroli district; 18 km journey carrying a cot for an injured father. What exactly happened? Look..
#Gadchiroli #maharashtra #Bhamragad #MaharashtraNews #GadchiroliNews गडचिरोली #MarathiNews