दि. 02 ऑगस्ट 2025
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गडचिरोलीतील दोन रुग्णांना प्रत्येकी एक लाखाची मदत.!
- मदतीसाठी पात्र गरजू रुग्णांनी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाशी संपर्क करावा - जिल्हाधिकारी
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील दोन गरजू रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. यामध्ये गोकुलनगर, गडचिरोली येथील रहिवासी किरण दिनेश कोहचाळे आणि दादापूर, कुरखेडा येथील तथागत मोहन वैद्य यांचा समावेश आहे. हे दोन्ही रुग्ण सध्या नागपूर येथे उपचार घेत आहेत.
किरण कोहचाळे, यांना हृदयरोगाच्या उपचारासाठी तर तथागत मोहन वैद्य यांना मेंदूरोगाच्या उपचारासाठी मदत देण्यात आली आहे.
इतर गरजू रुग्णांना आवाहन..
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील इतर गरजू आणि पात्र रुग्णांनाही मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. यामुळे अनेक गरजू रुग्णांना उपचारासाठी आवश्यक आर्थिक मदत मिळू शकते.
मुख्यमंत्री सहायता निधी गरजू रुग्णांना त्यांच्या गंभीर आजारांवरील उपचारासाठी आर्थिक मदत देऊन आधार देत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील या दोन रुग्णांना मिळालेली मदत ही त्याच योजनेचा एक भाग आहे, असे त्यांनी सांगितले.