दि. २२ डिसेंबर २०२५
MEDIA VNI
जनतेच्या सेवेसाठी धावणारी रुग्णवाहिका आगीत खाक; डोटकुली–वाघोली परिसरात हळहळ.!
मीडिया वी. एन.आय :-
तालुका प्रतिनिधी चामोर्शी: गंगाधर शेडमाके
गडचिरोली/ चामोर्शी : चामोर्शी तालुक्यात जनतेच्या आरोग्यसेवेसाठी अहोरात्र धावणारी एक महत्त्वाची रुग्णवाहिका आज आगीत पूर्णपणे जळून खाक झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. माझी पंचायत समिती सदस्य प्रमोद भाऊ भगत व तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा, चामोर्शीच्या माजी जिल्हा परिषद सदस्या कविताताई प्रमोद भगत यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली ही रुग्णवाहिका डोटकुली व वाघोली गावांच्या मधोमध अचानक लागलेल्या आगीत नष्ट झाली.
ही रुग्णवाहिका त्यांच्या कार्यकाळात शेकडो गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरली होती. नागपूर, सेवाग्रामसह विविध मोठ्या रुग्णालयांमध्ये कोणतीही फी न घेता रुग्णांना वेळेत दाखल करून उपचार मिळावेत, यासाठी ही रुग्णवाहिका सातत्याने कार्यरत होती. अनेक गंभीर रुग्णांचे प्राण वाचवण्यात या सेवेचा मोलाचा वाटा होता.
घटना घडली त्या वेळी रुग्णवाहिका वाघोली गावातील रुग्णाला आणण्यासाठी जात होती. अचानक वाहनातून धूर निघू लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत त्वरित वाहनाबाहेर उडी घेतली. सुदैवाने त्या वेळी रुग्णवाहिकेत कोणताही रुग्ण नसल्याने जीवितहानी टळली. मात्र काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण करत संपूर्ण रुग्णवाहिका भस्मसात झाली.
MH-33-G-618 क्रमांकाची ही रुग्णवाहिका केवळ एक वाहन नव्हते, तर गरिबांच्या आरोग्यसेवेचा आधारस्तंभ होती. त्यामुळेच या घटनेनंतर डोटकुली व वाघोलीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, “शेकडो जीव वाचवणारी रुग्णवाहिका आज स्वतःच काळाच्या पडद्याआड गेली,” अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवेपुढे मोठे आव्हान उभे ठाकले असून, तातडीने नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे.

